Wednesday, December 3, 2008

स्वाभिमानाचे अग्निकुंड पेटलेच पाहिजे आई तुळजाभवानीच्या मूर्तीवर घण बसले, तेव्हा भाल्याच्या टोकावर अफझलचं मुंडकं नाचेपर्यंत या महाराष्ट्रात कोणी स्वस्थ बसले नव्हते। संभाजी महाराजांच्या देहाचे तुकडे तुकडे झाले, तेव्हा घराघरातून तलवार उठली। औरंग्याला इथेच गाडेपर्यंत शांतता नव्हती। लालाजींच्या अंगावर यमदूतांच्या लाठया बरसल्या, तेव्हा इंग्रज साम्राज्याच्या शवपेटीवर खिळे ठोकणारे कैक मर्द निपजले... मग आत्ताच का सगळं शांत शांत? आमच्या श्रध्दास्थानांवर आघात होतात, आणि आम्हालाच सगळे म्हणतात 'शांत रहा, शांत रहा'। जाहीरपणे आम्हाला बांगडयाच भरायला सांगितले जाते। का? आम्ही काय नेभळट आहोत का? की आम्ही दूधखुळे आहोत - उगी उगी हं बाळा, तुला नाय कोनी माल्लं, गप गप... असं म्हटलं की आम्ही गप्प! हाताची घडी तोंडावर बोट? आम्ही जवान आहोत, मर्द आहोत... रक्तात शिवाजी सळसळतो आमच्या, 'शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा' म्हणणारा भीम सळसळतो! आमच्या हातात भवानी आहे, पण डोळयावर पट्टी आहे। आम्हाला शत्रू कोण, हेच कळत नाही. गनिम कावा साधून जातो, आणि मग आम्ही मेणबत्त्या घेऊन मूक मोर्चे काढतो. असल्या भेदरट मेणबत्त्यांच्या उजेडात दुष्मन दिसत नाही. त्यासाठी डोक्यात उजेड पडावा लागतो आणि छाती निधडी असावी लागते. आमच्यात आणखी एक प्रकार आहे. राग आला की, आम्ही शेजार पाजारच्यांना ठोकून काढतो, दंगे करतो. खूप भुई थोपटतो पण साप मरत नाही. मीडिया काहीही सांगतो, आणि आपण ऐकतो? कोणी म्हणतं इस्लामी अतिरेकी, तर कोणी म्हणतं दहशतवाद्याला धर्म नसतो... सुटका झालेल्या दोन तुर्की नागरिकांनी सांगितलं, की आम्हाला अतिरेक्यांनी आमचा धर्म विचारला, आम्ही मुसलमान म्हणून आम्हाला सोडले, सोबतच्या तीन आर्मेनियन ख्रिस्ती महिलांना ठार मारले. पकडलेला अतिरेकी सांगतो की, मी मदरशात शिकलो. आमचे गृहमंत्रालय म्हणते, की उत्तर सीमेवर मदरसे वेगाने वाढतायत... हे सगळं काय आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. माझे मुसलमान मित्र-मैत्रिणी आहेत, ते अतिरेकी नाहीत. आमचे लाडके माजी राष्ट्रपती, आमचे गायक, संगीतकार, खेळाडू, परमवीरचक्र मिळवलेले शहीद सैनिक - हेही मुसलमान आहेत. पण ते जिहादी नाहीत... मग हा जिहाद काय आहे, मदरसे काय आहेत, या विषवल्लीचं मूळ कुठे आहे? आम्हाला उत्तरं मिळालीच पाहिजेत. उत्तरं मागण्याचा अधिकार हे लोकशाहीतले पहिले हत्यार आहे. आहे ना खुमखुमी? मग उचला हे हत्यार! तीस-पस्तीस वर्षांपूर्वी इस्राएलच्या खेळाडूंची ऑलिंपिक मध्ये हत्या झाली होती. पुढच्या दोन वर्षात ही हत्या करणाऱ्या प्रत्येक अतिरेक्याला जगाच्या कानाकोपऱ्यातून शोधून काढून इस्राएलच्या कमांडोंनी ठार मारले. दुसऱ्या महायुध्दात हजारो ज्यूंची हत्या करणाऱ्या ऍडोल्फ आइकमनला इस्राएलच्या हेरांनी परदेशातून शोधून उचलून आपल्या देशात आणला, त्याच्यावर खटला चालवला, आणि त्याला देहदंड दिला. टीचभर देश आहे इस्राएल. पण त्यांचा राष्ट्रीय स्वाभिमान जागा आहे. कोण आहेत त्यांचे नेते? आणि मग आमचेच असे कसे? आम्ही मतदानाच्या दिवशी पिकनिकला जातो, किंवा आमची मतं विकतो, किंवा १८ पूर्ण झाली तर नावच नोंदवत नाही... मत देताना रस्ते आणि पाणी एवढेच मुद्दे दिसतात आम्हाला, मग निवडणूक पंचायतीची असो नाही तर लोकसभेची! लोकशाहीत प्रजेच्या लायकीवर किंवा नालायकीवर राजा ठरतो. आम्हाला स्वाभिमानी निडर नेतृत्त्व हवे असेल, तर जागरूक राहिले पाहिजे. आत्ताच्या नेत्यांमध्ये सगळेच बुणगे दिसत असतील, तर स्वत:च राजकारणात उतरले पाहिजे. शांत रहा, शांत रहा... असं कोणीही सांगितलं तरी गप्प बसण्याची वेळ नाही आता. लोकशाहीतली हत्यारं उचलून लढलं पाहिजे. सूडाच्या अग्निकुंडात आपल्या अभिमानाची आहुती पडली आहे. संसदेवर हल्ला झाला आहे, ताजची राख झाली आहे... इतक्या आहुती देऊनही जर स्वाभिमानाची भवानी जागी होणार नसेल, तर आमचे राष्ट्र नष्टच होणार असेल. शंभर शिशुपालांचे हजार अपराध भरलेत, जनतेतल्या जनार्दना - उठ! - मिलिंद थत्ते


milindthatte@gmail.com

1 comment:

aativas said...

The question is 'have we learnt anything from history'? Whether we like or not, different religions are going to be here .... in every religion there will be few fundamentalists and some tolerant people. How we are going to seggragate people and how we are going to deal differently with them is the real issue. 26/11 is not an isolated event, it is one in the chain... we need long term strategy which will lead to immediate actions ... and these actions will keep on changing.....